महाभारतातील व्यक्तीरेखेंतुन आपण काय शिकायचे?

           महाभारत हे एक प्रतिसृष्टी वाटण्याइतपत निर्माण झालेले आहे असे वाटते. कधी कधी हे माणसांचेच जग असुन त्यात माणसांचेच मनोव्यापार दिसतात. यातल्या अनेक व्यक्तिरेखा आजही आपण बघत असतो. मनात पीळ हवा पण अहंकार नको, प्रामाणिकता हवी पण दुष्टता नको हेच या सर्व व्यक्तिरेखा दर्षवितात म्हणुनच त्या आजही वाचाव्याशा वाटतात.त्यावर लिहावेसे वाटते, ऐकावेसे वाटते, पहावेसे वाटतेपुन्हा पुन्हा. माणसांच्या स्वाभाविक वृतींचाच हा एक चित्रपट भासतो. त्यातुनच जगण्याचा,झुंजण्याचा मार्गही दिसतो. अशा अनेक व्यक्ती/प्रसंग व्यावहारिक जगाचा आरसा दाखविणारे तर भावना, कर्तव्य, निष्ठा, दु:ख, सोशिकता असे अनेक गुणही महाभारतात आढळतात.

        पुढिल 4 महिन्यांत प्रत्येक आठवड्याला एक असे व्यक्तिमत्व लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. या वर्ष अखेरपर्यंत पुर्ण होईल किंवा नाही ते सांगता येणार नाही पण हा प्रवास असाच पुढे चालु राहील. यामध्ये स्त्री-पुरुष दोघांचाही विचार करण्यांत येणार आहे. यासाठी लागणारे संदर्भग्रंथ:- पंचनायिका आणि शक्ती- वसंत कडेकर आणि डॉ.पोतदार 2) मृत्यूंजय:- शिवाजी सावंत 3) महाभारतातील व्यक्तीरेखा-डॉ.विमल पवनीकर 4) महाभारतातील स्त्रिया-भाग-2-डॉ.ए.च. साळुंखे. 5) आकाश मनाचे-सोनाली तेलंग(फे.बु.)अशी अनेक पुस्तके,संदर्भं यांची मदत मला माझ्या लिखाणात झाली.

         महाभारतावर मी कधी लिहू शकेन असे मला स्वत:लाच कधी वाटले नव्हते. त्यातील व्यक्तिरेखा मनात कायम कुतूहल,उत्सुकता,मानवी स्वभाव विशेष आणि परिस्थितिनुरुप वागणारे म्हणुन आदर्ष वाटतात. कसे वागु नये, त्याचे परिणाम काय होतात याबाबतचा धडाही यातुन आपणांस शिकायला मिळतो. यातील प्रत्येक व्यक्ती ध्येयदर्षी व स्वप्नवत जगण्यांत धन्यता मानत होती हे विशेष. तसेच प्रेअत्येक व्यक्ती दुष्टता व प्रखर तत्वनिष्ठा यात कुठेही मोडुन पडत नाही की निराश होत नाही तर उलट प्रत्येक प्रसंगाला धिटाईने समोरी जात आहे. संघर्ष प्रत्येकाच्या मनात आहे पण तरीही प्रत्येक व्यक्ती प्राप्त परिस्थितीला निकराची झुंज देते हे मला जास्त भावले.

         महाभारतातुन नेमके शिकायचे काय? हा मोठा गहन प्रश्न आहे त्याचेच उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न म्हणा हवे तर! जितके आपण वाचत जातो तितके आपण हे समजुन घेण्याचा प्रयत्न करतो. महाभारतातील प्रत्येक नाती/ व्यक्तीरेखा आपल्याला विचारते? तुम्ही खरंच प्रेम करत होतात कि फक्त एकमेकांचा उपयोग करत होतात? निष्ठा नाते वाचवु शकते का? उपकारापेक्षा स्विकार महत्वाचा नाही का? नात्यांची खरी परिक्षा युद्धातच घडते का? साथ देणे कि स्वातंत्र्य जपणे महत्वाचे? खरे नाते निर्णय घेत नाही,निर्णय घेण्यासाठी सक्षम बनविते?सत्य बोलणारा माणुस कायम एकटाच उरतो. नाते टिकविण्यासाठी नेहमीच जिंकणे महत्वाचे नसते. रक्ताची नाती जन्म देतात तर मनाची नाती आयुष्य देतात. शेवटी ही एक युध्दाची कथा नसुन नाती हरवु नयेत म्हणुन वेळेत माणुस होण्याची कथा आहे.

          कदाचित हे सगळे वाचुन तुम्हाला नवीन काही मिळणार नाही पण जे आधीपासुन आहे ते स्पष्ट होईल. थोडंसं जरी स्पष्ट झाले तरी ही संपुर्ण यात्रा सार्थक झाली असे समजावे. संघर्षानंतर स्वत:ला जाणुन घेणे महत्वाचे आहे. मी जे मिळवतोय ते खरेच समाधानकारक आहे? ही समज, जाणीव,सजगता आहे ती येणेच महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा संशोधनास युक्त असुन त्याचा 2 पानांत परामर्श घेणे खरे तर कठिणच आहे. त्यामुळे त्यांच्या कथा, व्यथा, स्वभाव, कर्तत्व,महत्व व ते पात्र का आवश्यक आहे याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न मी या लेखांमधुन करणार आहे. महाभारत हा एक जगण्याचा राजरस्ता असुन त्या व्यक्तीरेखांचा अभ्यास करावासा वाटल्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न. याआधीही ब-याच जणांनी हा प्रयत्न केलेला आहे. माझेही त्यात एक ओंजळभर अर्घ्य.  कुठे,कमी अधिक उणे आढळल्यास त्याबद्दल क्षमस्व. प्रयत्न कसा वाटतो? आवडला तर नक्की कळवा.

                              !! शुभास्ते पंथान: संतु !!






Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव